A.I. at primary level?


एका टुमदार गावातल्या, निसर्गरम्य वातावरणातल्या शाळेत मी जातो. शिक्षक मला वर्गावर घेऊन जातात. ‘डिजिटल क्लासरुम’ दाखवतात. एका चुणचुणीत मुलीला ‘माझी आई’ या विषयावर निबंध लिहायला सांगतात. ती मुलगी ‘एआय’चा वापर करते, योग्य प्रॉम्प्ट्सचा उपयोग करते आणि जोरदार निबंध लिहिते. शिक्षक माझ्याकडे विजयी मुद्रेने बघतात.

हे दृश्य पाहिले आणि खचलोच मी!

‘विज्ञान शाप की वरदान?’ हे आपण गेल्या अनेक वर्षांपासून ऐकत आलो आहोत. विज्ञानामुळे माणसाचा विनाश होऊ शकतो, अशी शक्यताही काही वेळा व्यक्त झाली. मात्र, एकूणच पाहता, विज्ञानाने माणसाच्या प्रगतीमध्ये मोठा हातभार लावला आहे, याबद्दल काही शंका नाही.

त्यामुळे आता एआयबद्दलही ‘एआय शाप की वरदान?’ अशा छापाची चर्चा होत आहे. पुढे काही काळ ही चर्चा होईल आणि नंतर एआय मानवी प्रगतीमध्येच मोठी भूमिका बजावेल, असे अनेकांचे अंदाज आहेत. ते अगदी चुकीचे आहेत, असेही म्हणता येणार नाही. पण मला असे वाटते की, एवढ्या साध्या पद्धतीने एआयकडे पाहता येणार नाही.

आजवर विज्ञानाने अनेक गोष्टी केल्या. त्यामध्ये चांगल्या गोष्टी निश्चितच अधिक आहेत. पण काही विनाशकारी कृत्यांमध्येही विज्ञानाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग होता. हिरोशिमा आणि नागासाकी अणुबॉम्बने उद्ध्वस्त झाले. त्यामागे युद्धाची कारणे होतीच; पण भौतिकशास्त्रज्ञांच्या शोधांमुळे अणुबॉम्बसारखी विनाशकारी शस्त्रे निर्माण करणे शक्य झाले, हेही मान्य करायला हवे.

मात्र, या सगळ्यापेक्षा आजचे संकट वेगळे आहे.

आजवर विज्ञानाने अनेक गोष्टी केल्या; पण मानवी मेंदूलाच त्याने कधी आव्हान दिले नव्हते. कृत्रिम का असेना, पण आपल्याकडेही बुद्धिमत्ता आहे, असे तंत्रज्ञानाने जाहीर केले नव्हते.

बुद्धिमत्ता, विचार करण्याची क्षमता, सृजनशीलता आणि अभिव्यक्ती या गोष्टी माणसाच्याच आहेत. तंत्रज्ञान आपल्याला फक्त सहाय्यभूत ठरू शकते किंवा फार तर आपले साधन होऊ शकते, अशी आतापर्यंत तंत्रज्ञानाची भूमिका होती.

पहिल्यांदाच आज तंत्रज्ञान या प्रकारे विचार करू लागले आहे. तंत्रज्ञान या प्रकारे भूमिका घेऊ लागले आहे आणि या प्रकारे अभिव्यक्त होऊ लागले आहे. हे फार वेगळे आहे.

युवाल नोआ हरारी ‘सेपिअन्स’मध्ये म्हणतो की, होमो सेपियन्स अन्नसाखळीमध्ये अगदी शेवटच्या क्रमांकावर होता. तो पहिल्या क्रमांकावर कसा पोहोचला? त्यामागे त्याचा प्रगत मेंदू, विचार करण्याची क्षमता आहे. आणि, मुख्य म्हणजे त्याला गॉसिप करायलाही आवडते. ही कारणे आहेत. म्हणजेच इतरांच्या आयुष्यात डोकावण्याची, तिथे काय चालले आहे हे जाणून घेण्याची त्याची इच्छा असते.

आता ‘एआय’ या सगळ्याच बाबतींत माणसाची बरोबरी करू लागला आहे. आणि, हे अधिक भयंकर आहे.

दुसरीकडे, एआय अत्यंत प्रभावीपणे विचार करतो आणि अभिव्यक्तही होतो. त्याच्याकडे आपली स्वतःची भाषा आहे. पण एवढेच नाही. साधारणपणे विज्ञान-तंत्रज्ञानाच्या सगळ्या गोष्टी अचूक असतात. किंबहुना, जे काही त्याला सापडलेले आहे, त्यावर आधारित अचूक उत्तर देण्याचा विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रयत्न असतो.

एआयच्या बाबतीत मात्र फक्त एवढेच नाही. ‘एआय’ माणसासारखाच अंदाज बांधायला लागला आहे. तो गॉसिपही करतो. तो अगदी बोलबच्चनसारखे उत्तर ठणकावून देतो. त्याच्याकडे जी थोडीफार माहिती आहे, तिच्या आधारे मोठमोठे लेख लिहू शकतो, भाषणे ठोकू शकतो. हे सगळे थेटपणे माणसाला आव्हान देणारे आहे.

आणि दुसरीकडे, जी क्षमता माणसाची आहे; विचार करण्याची; व्यक्त होण्याची; सर्जनशीलतेची, ती क्षमता माणूस मात्र हरवत चालला आहे. अशी आताची परिस्थिती आहे.

आपले शिक्षणक्रम जर आपण पाहिले, तर त्यामध्ये विचारी विद्यार्थी घडतील, अभिव्यक्त होणारे विद्यार्थी घडतील, अशी अपेक्षा बाळगणे अगदीच कठीण आहे. साधे दहा-बारा ओळींचे नीट पत्रही मुलामुलींना लिहिता येत नाही. एखाद्या साध्या गोष्टीवर कसा विचार करावा, हेही मुलामुलींना समजत नाही.

आपल्या सगळ्या व्यवस्थेने त्यांच्यासाठी चाकोऱ्या आखून दिल्या आहेत. त्या चाकोरीत मुले वर्षानुवर्षे राबत असतात, त्यांना काहीतरी गुण मिळतात आणि त्यानुसार ते आपले करिअर निवडतात. पण एकूणच पाहता, शिक्षणातून विचारी विद्यार्थी घडत आहेत, असे काही दिसत नाही.

अशा वेळी एका बाजूला अत्यंत विचार करणारा, बुद्धिमान, स्मरणशक्ती असलेला, उत्तम अभिव्यक्ती असणारा, हजरजबाबी, प्रसंगावधान राखणारा आणि वेळ मारून नेणारा एआय आहे; आणि दुसरीकडे अशा क्षमता संपत चाललेला माणूस आहे. त्याचा टिकाव या नव्या जगात कसा लागणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.

आता तर वेगळीच चिंता पुढे आली आहे. एक अनियंत्रित आणि मानवी मूल्यांशी विसंगत असलेला (Rogue) आर्टिफिशियल इंटेलिजन्स मानवी समुदायासाठी गंभीर धोका ठरू शकतो, कारण मानवी सुरक्षिततेला बाधा आणणाऱ्या कृती तो स्वतःहून करू शकतो. डिजिटल सुरक्षा कवच तोडू शकतो. जागतिक यंत्रणा विस्कळीत करू शकतो. अवघे जग त्यामुळे धास्तावलेले आहे.

एआयचे अनेक फायदे आहेत, यात काही शंका नाही. एआयमुळे अनेक चांगल्या गोष्टी घडतात. एखाद्या कोर्टाचा निकाल किंवा निकालपत्र कितीही पानांचे असले, तरी एआय काही सेकंदांत त्याचा सारांश देऊ शकतो. अशा अनेक बाबतींत एआय उपयुक्त आहे.

पण, एआयचा उपयोग प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणामध्ये सुरू झालेला आहे, ही मात्र भयंकर काळजीची गोष्ट आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील मुले जर या प्रकारे आपला विचार एआयकडे ‘आउटसोर्स’ करायला लागली आणि फक्त प्रॉम्प्ट लिहिणे, फार तर प्रश्न विचारणे एवढेच शिकू लागली, तर पुढे या मुलामुलींचे काय होणार? सृजनशीलताच संपेल या पोरांची!

प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणामध्ये एआयचा वापर वाढत गेला, तर या पिढीचे भविष्यात काय होणार, ही फार मोठी चिंता आहे.

अलीकडे अगदी जिल्हा परिषद शाळांनीसुद्धा आधुनिकीकरणाच्या नावाखाली डिजिटल स्कूल्स, एआयचा उपयोग, संगणकीकरण यांचे एवढे स्तोम माजवले आहे की, हे म्हणजेच शिक्षण, असा गैरसमज अनेकांचा होऊ लागला आहे. खासगी आणि इंग्रजी शाळांमध्ये तर हे प्रकरण भयंकर विकोपाला गेलेले आहेच. पण सार्वजनिक शाळांमध्येही सुधारणेच्या नावाखाली असे भलते प्रयोग सुरू आहेत.

मोठ्या प्रमाणावर कॉर्पोरेट कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करून किंवा सीएसआरचा फायदा घेऊन शाळांना चकचकीत बनवण्याचे उद्योग सुरू झाले आहेत.

खरे म्हणजे, हे दोन टोकांना जाणारे चित्र आहे. एकीकडे शाळांना चकचकीत बनवण्याचे उद्योग सुरू आहेत आणि दुसरीकडे शाळाच नकोत, अशा प्रकारे होमस्कूलिंगची चळवळ मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे.

मला असे वाटते की, याचा मध्यम मार्ग साधला गेला पाहिजे. कारण शेवटी कोणी कितीही म्हटले तरी ‘होमस्कूलिंग’ हा काही अंतिम, शाश्वत पर्याय असू शकत नाही. शाळा हे एक पर्यावरण आहे. शाळा ही एक संस्था आहे. आणि शाळेमध्ये मुलांना जे मिळते, ते अन्यत्र मिळू शकत नाही. पण त्यासाठी शाळेमध्ये नक्की काय असले पाहिजे, याचा व्यवस्थितपणे विचार करण्याची आवश्यकता आहे.

जिथे मुले मातीमध्ये हात घालत नाहीत, जिथे मुलांना आकाश न्याहाळता येत नाही, जिथे मुला-मुलींना नाचण्यातला, गाण्यातला, लिहिण्या-बोलण्यातला, चित्रातला आनंद समजत नाही, जिथे मुले-मुली वेगळा विचार करू शकत नाहीत, अशी शाळा काय कामाची?

आणि, अशा शाळा म्हणजे कारखान्यातून ज्याप्रमाणे एकाच प्रकारचे प्रॉडक्ट बाहेर पडते, तसे साचे झाले आहेत. त्या साच्यातून आयआयटीचे विद्यार्थी बाहेर पडतील, शाळांमधून आयएएस अधिकारी बाहेर पडतील, शाळांमधून आयटी क्षेत्रातील व्यावसायिक बाहेर पडतील, त्या शाळांमधून डॉक्टर्स बाहेर पडतील… असे काहीतरी सुरू झाले आहे.

पण मुख्य मुद्दा जो आहे, तो मागेच पडला आहे.

मला प्रश्न पडतो की, रवींद्रनाथ टागोरांनी त्या काळात शांतिनिकेतनसारखा प्रयोग सुरू केला. त्या प्रयोगाबद्दल आज आपण किती बोलतो! शांतिनिकेतन आता आहे कुठे? कलेचे बोट सुटलेले आपल्याला कळते कुठे?

खरे म्हणजे, अशा प्रकारच्या प्रयोगांची आज खूपच आवश्यकता आहे.

मी मध्यंतरी एका खेड्यातल्या छोट्या शाळेमध्ये गेलो होतो. तिथे मला ते डिजिटल क्लासरूम दाखवत होते. आमच्या मुलांना एआय कसे येते, हे दाखवत होते. आमच्या मुलांनी अलीकडे शाळेत कार्यक्रम झाला, पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम झाला, तर एआयला सांगून स्वातंत्र्यदिनाचे पूर्ण भाषण तयार केले आणि ते जोरात म्हटले.

आता याचे कौतुक का वाटते शाळांना? याचा आनंद का होतो शाळांना? हे काही मला समजत नाही.

जर मुलांनी भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्याविषयी, भारताविषयी बोलण्यासाठी एआयची मदत घेतली आणि स्वतः विचारच केला नाही, तर त्याला काय अर्थ आहे?

एका विशिष्ट वयाच्या टप्प्यावर तुम्ही एआयचा उपयोग करून घेऊ शकता, ते ठीक आहे. आणि त्यासाठी मुलांनी अगदी लहानपणापासून एआयचा उपयोग शिकण्याची आवश्यकता अजिबात नाही. तुम्ही नंतरच्या टप्प्यावर ते शिकू शकताच.

हेन्री किसिंजर जवळपास शंभर वर्षांचे असताना मरण पावले. त्यांचे शेवटचे पुस्तक एआयशी संबंधित होते. त्यामुळे एआय समजण्यासाठी प्राथमिक शाळेपासूनच ते शिकण्याची काय गरज आहे? तुम्ही कोणत्याही टप्प्यावर ते शिकू शकताच.

पण, प्राथमिक स्तरावर एआयचा वापर करणे फारच भयंकर आहे. शाळेमध्ये गेल्यानंतर मुलांनी गाणी म्हणावीत, त्यांच्याकडे वेगवेगळ्या कविता पाठ असाव्यात, त्यांनी काहीतरी वेगळी रांगोळी काढलेली असावी, त्यांनी छान बाग फुलवलेली असावी, छान चित्रे काढलेली असावीत, एखादा नवीन वैज्ञानिक प्रयोग केला असावा, एखादा गमतीदार शोध, नवा शोध लावलेला असावा.

हे दाखवण्याऐवजी हल्ली शिक्षक डिजिटल क्लासरूम वगैरे दाखवू लागले आहेत. हे फारच चिंताजनक आहे.

मला असे वाटते की, एआयकडे आपण टिपिकल ‘शाप की वरदान’ वगैरे या परिप्रेक्ष्यातून पाहता कामा नये. कारण एआयची तुलना त्या अर्थाने अण्वस्त्रांशी किंवा आणखी कशाशीही करता येणार नाही.

मी म्हटल्याप्रमाणे, ते मानवी बुद्धीला आणि मेंदूला ज्या प्रकारचे आव्हान आहे, ‘होमो सेपियन्स’ नावाचा माणूस ज्या प्रकारे घडला, त्याच्या जडणघडणीलाच हे आव्हान आहे.

त्यामुळे प्राथमिक शिक्षणात घुसलेले एआय माणसामधले माणूसपणच संपूर्णपणे नष्ट करू शकते. अशा मुलांना मोठं झाल्यावर, दादा कोंडकेंच्या शैलीत ‘ए आय!’ म्हणायची पाळी येणार आहे. त्याची चिंता मला अधिक आहे.

Leave a comment