‘अरे टोणग्या, दिवसरात्र अभ्यास कर नाहीतर जून महिन्यात लोक आमच्या तोंडात शेण घालतील’, ‘ मार्क मिळाले नाहीत तर समाजात आम्हांला काडीची किंमत राहणार नाही ’, ‘लोकांपुढं मान खाली घालायची वेळ येईल’, ‘अमुक अमुक काॅलेजात ॲडमिशन मिळाली नाही तर आयुष्यभर हमाली करत बसावं लागेल’, ‘ चाळीस-पन्नास टक्क्यांची मार्कलिस्ट घेऊन आलास तर आम्हांलाच आत्महत्या करण्याची वेळ येईल ’, ‘आम्ही इतके कष्ट करतो ते कुणासाठी?’ असले डायलाॅग्ज वारंवार उच्चारल्यामुळे परीक्षा ही एक नसती आफत आहे, असा ग्रह मुलांच्या मनात तयार झाला नाही, तरच नवल
. हे असले संवाद ऐकले की, पालकांना मुलांच्या भवितव्यापेक्षासुद्धा स्वत:च्याच स्टेटसची चिंता अधिक आहे, हे स्वच्छ समजतं.
साधारण तीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिना आला की, तो प्रसंग मला आठवल्यावाचून राहत नाही. परीक्षा तोंडावर आली असतानाच एक पालक त्यांच्या मुलावरच्या शिक्षणाच्या खर्चाचा हिशोब मला सांगत होते. “ साठ हजार रूपये शाळेची फी, तेवढीच ट्यूशन फी, व्हॅनची फी, वह्या-पुस्तकं- स्टेशनरीचा खर्च, दर आठवड्याला हाॅटेलात नेतो- हवं ते खाऊपिऊ घालतो, इतकं सगळं करूनसुद्धा हा दिवटा परीक्षेत पन्नास टक्क्यांच्या पुढं जात नाही .
कितीही पाठ केलं तरी माझ्या लक्षातच राहत नाही म्हणतो. काही नाही हो, ही सगळी त्याची नाटकं आहेत नाटकं..! बापाला कसं लुटायचं एवढं चांगलं जमतंय बघा त्याला..!”
दिनूच्या बिलाची ही आधुनिक गोष्ट मी ऐकत होतो आणि गोष्टीतला दिनू माझ्यापुढं केविलवाणं तोंड करून रडत होता. ‘ इंजिनिअरींग करायचं असेल एसएससी बोर्डाचा काहीही उपयोग होणार नाही, सीबीएसई बोर्डच उपयोगी आहे’ असा कुण्या विद्वानाने दिलेला सल्ला त्यांनी ऐकला आणि आठवीची परीक्षा झाल्यानंतर ऐन नववीच्या वर्षातच शाळा बदलली
. पण ह्या निर्णयाचा परिणाम काय होईल, याचा विचारच त्यांनी केला नव्हता. तो बिचारा मुलगा मात्र अभ्यासाच्या चक्रव्यूहात पुरता अडकला होता. पण आता मुलाचं मेरीट हा त्यांच्या प्रतिष्ठेचा मुद्दा झाला होता. त्याचा चेहरा पाहताना मला माझे शाळेचे आणि परीक्षेचे दिवस आठवले.
तेव्हा गाड्या किंवा स्कूल बसेसचा सुकाळ नव्हता. शाळेत किंवा शिकवणीला एकतर पायी जायचं किंवा सायकलवर जायचं, एवढे दोनच पर्याय होते. नियमित चालणं व्हायचं आणि त्या निमित्ताने मित्रमैत्रिणींशी प्रत्यक्ष बोलणं व्हायचं. शाळेच्या वाटेवर चालत जाताना स्वत:शी विचार करणं आपोआप घडायचं. शिवाय घरातून कामं सांगितली जायचीच. भाजी आणणं, वाणसामान आणणं अशी कामं घरातली मोठी माणसं सांगायचीच. पायी चालण्यामुळं, इतरांशी बोलल्यामुळं ताण कमी व्हायचा. किंबहुना, जाणवायचाच नाही.
देवपूजेसाठी बागेतून फुलं आणणं किंवा दुर्वा खुडून आणणं ही कामं मुलामुलींची नित्याची कामं होती. सकाळच्या उन्हात अनवाणी पावलांनी पंधरा-वीस मिनिटं मातीमध्ये चालणं तर व्हायचंच, शिवाय विविध फुलझाडांचा सहवास.. एकवीस दुर्वांची जुडी तयार करताना गणपतीचं नाव घेत जा असं मोठी माणसं सांगायची. सकाळी त्या पंधरा-वीस मिनिटांमध्ये कोवळ्या गवतात चालताना-फिरताना छान वाटायचं. कारण, ही दोन्ही कामं मनावरचा ताण हलका करायची, अगदी बिनबोभाट..! आता मोठ्या माणसांनासुद्धा ह्याच कृती आवर्जून करण्याचा सल्ला अनेक डाॅक्टर्स देतात.
आजीला हाताला धरून देवळात सोडून येणं किंवा संध्याकाळी प्रवचनानंतर आणायला जाणं हे काम घरातल्या मुलामुलींकडेच असायचं, अगदी दहावी-बारावीत असलं तरीही..! या कामाच्या बदल्यात कॅडबरी किंवा तत्सम काही मिळायचं नाही. खारका, फुटाणे, खडीसाखर, एखादं फळ वगैरे मिळायचं. पण त्या अर्ध्या तासामुळं आजीशी बोलणं होत होतं. मनही मोकळं होत होतं.
घरातल्या माणसांकडे मुलांकरिता खूप वेळ होता, असं नाही. पण, घरातल्या मुलामुलींना केवळ अभ्यासातच चिणून मारण्याची पद्धत तेव्हा नव्हती
निरनिराळ्या लहान-सहान कामांची जबाबदारी मुलांचं कौशल्य प्रशिक्षणही करत होती आणि त्यांना तणावमुक्तही ठेवत होती.
खाण्यापिण्यातल्या बऱ्यावाईट गोष्टींचं भान लोकांना होतं, दुर्दैवानं आज ते उरलेलं नाही. सकाळी दूध आणि केळं, देवाच्या नैवेद्याचं ताजं लोणी किंवा पंचामृत, शाळेत जाताना घरचं गरम जेवण, शाळेच्या डब्यात पोळीभाजी, शाळेतून आल्यावर लाडू किंवा दडपेपोहे किंवा सांजा वगैरे पदार्थ असायचे. गुळाचा खडा, कच्चे शेंगदाणे रोजच खाल्ले जात होते
. शाळेच्या बाहेर वडापाव, बेकरी पॅटीस, कच्छी दाबेली, क्रीमरोल वगैरे गोष्टी मिळत नसत. चिक्की, रेवड्या, आवळे, विलायती चिंचा, बोरं, कैऱ्या, पेरू अशाच गोष्टी मिळायच्या. कोल्ड काॅफी, रेडबुल, कोल्डड्रिंक्स चे कॅन तेव्हा नव्हते. लिंबू सरबत, कोकम सरबत, ऑरेंज किंवा पायनॅपल सरबत असे पदार्थ मिळत. पूर्वीच्या आणि आताच्या पदार्थांची तुलना केली तर त्यांच्यापैकी अधिक घातक पदार्थ कोणते, हे आपणच स्वत:ला विचारावं.
तेव्हा कपड्यांचं किंवा फॅशनेबल गोष्टींचं फॅड नव्हतंच, पण खाणंपिणं मात्र पौष्टिक होतं. दही, दूध, तूप आहारात असायचं. तीन-चार प्रकारचे लाडू प्रत्येक घरात असायचेच. दहीभात किंवा मठ्ठा नियमित जेवणात असण्याने पोट शांत असायचं. अनेक सुशिक्षित पालक ‘या गोष्टी आमच्या मुलांना आवडतच नाहीत‘ असं अभिमानानं सांगतात आणि त्यांना नूडल्सवर जगवतात.
मुलींनी केसांत गजरा माळणं हे आजकाल आऊटडेटेड आणि काकूबाईपणाचं लक्षण मानलं जातं. पण सुवासिक फुलांचा गजरा हे मानसिक तणावमुक्तीचं एक फार शक्तिशाली साधन होतं, हे आपण का विसरून गेलो? रोज रात्री झोपताना केसांना तेल लावणं आपण का सोडून दिलं?
आजच्या काळात आपल्याला या गोष्टी जुनाट वाटायला लागल्यामुळेच सगळा घोटाळा झाला आहे आणि त्यामुळेच, ताणतणावाची भुतं आपल्या डोक्यावर थयथयाट करत नाचत आहेत.
स्वत:चे कपडे स्वत: धुणं, बागेतल्या झाडांना पाणी घालणं, घरातली वाहनं धुवून पुसून स्वच्छ करणं, कपड्यांना इस्त्री करणं किंवा बुटांना पाॅलिश करणं हे रिलॅक्सेशनचे फार सोपे आणि बिनखर्चाचे मार्ग आहेत. यामुळे, कामात बदल होतो आणि विरंगुळाही मिळतो.
वर्तमानपत्रात येणारं रोजचं शब्दकोडं सोडवणं हासुद्धा मुलांना तणावमुक्त ठेवणारा सोपा उपाय आहे.
अवांतर वाचनाची सवय नसल्यामुळे मुलं अनेक गोष्टींपासून वंचित राहतात आणि बौद्धिकदृष्ट्या कुपोषितच राहतात.
सभोवतालच्या चांगल्या गोष्टींपासून लांब ठेवायचं आणि केवळ पाठ्यपुस्तकांमध्येच गुंतवायचं हेच मुलांवरचा ताण वाढण्याचं मूळ कारण आहे. वर्षभर चोवीस तास एकाच गोष्टीचा मारा करत राहून विशेष काही साध्य होत असेल, असं वाटत नाही.
तणावमुक्त दैनंदिन आयुष्य आणि तणावमुक्त परीक्षा या दोन वेगवेगळ्या गोष्टी कशा असू शकतील? ‘ परीक्षा-परीक्षा – मार्क-मार्क’ अशी सहस्रनामावली वर्षभर मुलांपुढे म्हणायची आणि परीक्षेच्या तोंडावर मात्र ‘तू काळजी करू नकोस, टेन्शन घेऊ नकोस, मार्क कमी पडले तरी हरकत नाही’ असं म्हणायचं, हा शुद्ध दुटप्पीपणा होतो.
याउलट ‘परीक्षा म्हणजे आयुष्य नव्हे, परीक्षा हा आयुष्याचा एक भाग आहे.’ असंच म्हणणं अधिक चांगलं आहे. त्यामुळे, तणावमुक्ती हा केवळ परीक्षेपुरताच मर्यादित विषय राहणार नाही
. आपल्या मुलांनी संपूर्ण आयुष्यभर तणावाला सामोरं जाण्याची क्षमता विकसित करण्यासाठीच तर शिक्षण आणि परीक्षा असतात, केवळ मार्कलिस्ट मिळवण्यासाठी नसतात.
उत्तम आणि अभिरूचीसंपन्न आयुष्य जगण्याच्या सवयी आपल्याला मानसिक तणावापासून दूर ठेवतात. ‘प्रभाते मनीं राम चिंतित जावा’ असं समर्थांनी सांगितलंय, ते अनेक समस्यांवरचं प्रभावी उत्तर आहे. आयुष्याचा वेग कमी करणं आवश्यक आहे. सकाळी लवकर उठणं, थोडासा का होईना पण नियमित व्यायाम करणं, वेळच्या वेळी प्रमाणबद्ध योग्य संतुलित आहार घेणं, वेळच्यावेळी व्यवस्थित विश्रांती घेणं, मोकळ्या हवेत मैदानी खेळ खेळणं, कुटुंबातल्या सदस्यांसोबत एकत्र वेळ घालवणं, रात्री वेळेवर झोपणं या आयुष्यभरासाठीच्या उपयुक्त सवयी आहेत. त्या अगदी कटाक्षानं लावून घेतल्या पाहिजेत आणि पाळल्याही पाहिजेत.
श्रद्धा आणि प्रार्थना यांचं आयुष्यातलं महत्व फार मोठं आहे. हा आस्तिकता किंवा नास्तिकतेचा प्रश्न नाही. आपल्या हातून योग्य ती कृती घडण्यासाठी मनात विश्वास जागा असणं गरजेचं असतं. म्हणूनच, प्रार्थना महत्वाची. खरं तर, प्रार्थना हे पाॅझिटिव्ह थिंकिंगचं उत्कृष्ट उदाहरण आहे. पण, दुर्दैवानं अनेकांना त्यात धार्मिकताच दिसते
.
‘शुभंकरोती कल्याणं आरोग्यं धनसंपदा’ हे म्हणण्यातली धार्मिकता शोधायची की त्यामागचा विचार पहायचा, हेसुद्धा ठरवू न शकणारे पालक आहेत. प्रार्थना कोणतीही असो, तिचा सकारात्मक परिणाम आपण पाहणं आवश्यक आहे. अर्थातच, अमुक अमुक प्रार्थना म्हटल्यानं बोर्डाच्या परीक्षेत यश मिळेलच, असा अर्थ लावणं चुकीचं आहे. प्रार्थना ही अभ्यासाला पर्याय नसून ती आपली सकारात्मकता वाढवण्याकरिताच आहे.
‘पाच मिनिटंसुद्धा वेळ नसतो’ ही सबब मुळातच चुकीची आहे. अभ्यास सोडून दुसरं काहीही करणं म्हणजे महापाप आहे आणि तसं करणं हा दंडनीय अपराध आहे असंच वातावरण अनेक घरांमध्ये असतं. मुलंमुली नजरकैदेतच असतात. चुकून एखादी जरी पोळी जास्त खाल्ली तरी ‘सुस्ती येऊन झोपशील, मग अभ्यास कोण करेल? *’ असासुद्धा दम दिला जातो. कुणाशी बोलायचं नाही, गप्पा मारायच्या नाहीत, इतरांशी संवाद पूर्ण बंद…! याला काय अर्थ आहे?
व्यायाम करणं, मैदानावर खेळणं, जरावेळ शांतपणे बसणं, शवासन करणं याला ‘टाईमपास किंवा फुकट वेळ वाया घालवण्याचे उद्योग’ असं समजणारेही पालक आहेत.
वर्षभर पिझ्झा-बर्गर, वडापाव-पॅटीस हादडायचे आणि परीक्षा जवळ आल्यावर मात्र गुलकंद, च्यवनप्राश, शंखपुष्पी सुरू करणारेही पालक असतात. परीक्षा संपली की हे सगळं पुन्हा बंद होऊन जातं.. चांगल्या गोष्टी आयुष्यभर करायला हरकत काय आहे?
अत्यंत महत्वाची आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे केवळ परीक्षार्थीच नव्हे तर, संपूर्ण घरानंच स्ट्रेस फ्री रहायला-वागायला शिकायला हवं. तणावनियमनाची आवश्यकता परीक्षार्थी मुलांपेक्षा त्यांच्या पालकांनाच अधिक आहे. पालकांनी घरातलं वातावरण गंभीर, सुतकी होऊ देता कामा नये
. त्याचाच प्रतिकूल परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. जेव्हा आईवडील स्वत:चीच परीक्षा असल्यासारखे वागायला लागतात, तेव्हाच परिस्थिती अधिक ताणली जाते. पालकांच्या अशा वागण्यामुळे परीक्षा आणि मार्क यांच्याविषयीची भीती कमी होण्याऐवजी अधिकच वाढते. वातावरणातली सहजताच संपून जाते. हे सगळं टाळणं पालकांच्याच हाती आहे.
आताचा काळ स्पर्धेचा जरी असला तरी तो जीवघेण्या स्पर्धेचा होऊ न देणं, हे पालकांनाच शक्य आहे. स्पर्धा नेहमी खिलाडूपणेच झाली पाहिजे आणि केवळ भरभक्कम मार्कलिस्ट एवढंच सर्वस्व नसतं, हे पालकांनीच स्वत:शी मान्य केलं की, परीक्षेच्या ताणाचं मळभ आपोआपच दूर होईल आणि समाधानाचा स्वच्छ सूर्यप्रकाश आपल्या मुलामुलींच्या आयुष्यात येईल..!
अभिप्राय कळविल्यास मला सुधारणा करणे शक्य होईल ।
VSN🙏