देश तभी होगा महान


जब होगा नारी का सन्मान

HASTI PUBLIC SCHOOL & JR. COLLEGE ,DONDAICHA                                                                                                                                                          191                                                                                                                                                                                                                                                                         

स्त्री म्हणजे मातृत्वाचा झरा.स्त्री म्हणजे वात्सल्याचं प्रतिक अन् स्त्री म्हणजे त्यागाची मूर्तिमंत देवताच होय.स्त्री ही दोन विभिन्न कुटुंबातील सेतू असून,ती प्रत्येक युगात सातत्याने कुटुंबासाठी चंदनासारखं झिजत असते.स्त्री ही,कन्या, बहीण,पत्नी,आई अशा विविध भूमिकेतून  इमानेइतबारे कुटुंबाच्या उन्नतीकरिता आपलं योगदान देत असते.एवढं करूनही तिला कौटुंबिक व सामाजिक जीवनात अनेक समस्या अन् शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.हे सर्व घाव  सहनशिलतेने पचवून घेत हतबल न होता,ती आपली सातत्याने विविध क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत रहाते,याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे.यास्तव स्त्री जातीला आमचा सलाम!

मित्रहो,८ मार्च हा दिवस वैश्विकस्तरावर जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.मागील काही वर्षांपासून अमेरिका,युरोप,ब्रिटन,जर्मनी,भारत या देशांमध्ये स्त्री -पुरुष समानता,स्त्रियांना मतदानाचा अधिकार बहाल करणे,पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना वर्किंग हावर्स कमी देणे,वेतनवाढ,नोकरीच्या ठिकाणी महिलांना संरक्षण आदी मागण्यांसाठी विविध महिला संघटनांकडून आंदोलने झाली,मोर्चे निघाले.यातूनच महिलांच्या सन्मानासाठी अन् हक्कांसाठी सर्वानुमते ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याचे ठरले.१९७५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.या पार्श्वभूमीवर दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त थीम जाहीर केलं जातं.मागील वर्षी थीम होते,जेंडर इक्वालिटी टुडे…फॉर ए सस्टेनेबल टूमारो.जागतिक महिला दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या झेंड्यावर पर्लर,हिरवा,सफेद हे तीन रंग असतात.पर्लर हा रंग न्याय व गरिमाचं प्रतिक आहे.सफेद रंग हा पावित्र्याचं प्रतिक आहे, तर हिरवा रंग हा उमेदीचं प्रतिक आहे.जागतिक पातळीवर महिलांच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं म्हणजे स्त्री शक्तीचं संवर्धन करण्यास

 बळ देणं होय.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे स्त्री महात्म्यविषयी म्हणतात,स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातली देवता आहे.स्त्री मग ती शत्रूच्या मुलखातली असली,तरी ती मातेसमान असते.म्हणून तिचा यथेच्छ सन्मान झालाच पाहिजे.मानवी जीवनात स्त्रीचे महत्व अनन्यसाधारण असते.हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना लोकहितवादी व आदर्श राजा घडविण्यात आईसाहेब राजमाता जिजाऊ माँ साहेब यांनी अविश्रांत परिश्रम घेतलं.अर्थातच शिवबाला युद्धनीतीचे प्रशिक्षण देण्यापासून तर राज्याभिषेक करण्यापर्यंत त्या आयुष्यभर झटल्या.अशा थोर मां जिजाऊंना जागतिक महिला दिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा! यत्र नार्यास्तू पुज्यन्ते!रमन्ते तत्र देवता:!!

१८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या असामान्य शौर्याने झांसीची राणी लक्ष्मीबाई ह्या भारतीय इतिहासात अजरामर झाल्या.इंग्रज गव्हर्नर  डलहौसीला मेरी झांसी नही दूंगी असा सज्जड इशारा देत भारतभूमीच्या रक्षणार्थ आपल्या प्राणाची आहुती दिली.त्यांनाही या मंगलमय दिनी आम्ही वंदन करतो.

आजच्या महिला दिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आठवण होणं क्रमप्राप्तच ठरते.वैधव्याच्या दुःखाने वा पुत्रशोकाने हतबल न होता मोठ्या धैर्याने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी होळकरांचे तब्बल २८ वर्षे राज्य चालविले.प्रजाहितदक्ष राज्यकर्ती म्हणून रयतेत ओळख असलेल्या अहिल्याबाईंनी सर्वधर्मसमभाव या तत्त्वावर  यशस्वीपणे होळकरांचा  राज्यकारभार चालविला. आजच्या जागतिक महिला दिनी त्यांना आम्ही मराठीजन दंडवत प्रणाम करतो.

पारतंत्र्याच्या काळात म्हणजेच १९ व्या शतकाच्या मध्याला जेव्हा स्त्री ही शिक्षणापासून पूर्णतः वंचित होती.तिला चूल अन् मुल या चौकटीतच राहावं लागायचं. त्याकाळी स्त्रीला शिक्षण घेणं वर्ज्य होतं.अशा वेळी स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी तथाकथित समाजाचे बंधनं झुगारून फुले दाम्पत्य पुढे आलं.त्यांनी पुण्यात भिडेंच्या वाड्यात १जानेवारी १८४८ रोजी मुलींची शाळा सुरू करून स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ केली अन् ही शाळा देशातील पहिली मुलींची शाळा गणली गेली.तर सावित्रीबाई फुले ह्या पारतंत्र्याच्या काळातल्या पहिल्या महिला शिक्षिका म्हटल्या गेल्या.आईच्या महानतेसंदर्भात सावित्रीबाई म्हणतात,जिच्या हाती पाळण्याची दोरी,ती जगाते उद्धारी. तत्कालिन कर्मकांडी समाजाचा विरोध पचवून अन् जाचक छळ सोसून सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची बिजे रोवली.आज त्यांच्या पुण्याईमुळे २१ व्या शतकातल्या सावित्रीच्या लेकी ह्या शिकूनसवरून विज्ञान,तंत्रज्ञान,शिक्षण,

राजकारण,समाजकारण,

माहिती तंत्रज्ञान,साहित्य,कला,सिनेसृष्टी,उद्योग,बँकिंग,क्रीडा,विधी व न्याय,शेयर मार्केटिंग,वैद्यकीय, पत्रकारिता,इलेक्ट्रॉनिक मीडिया,संरक्षण,प्रशासन,

अंतराळ या क्षेत्रांत आघाडी घेताना दिसत आहेत.स्त्री शिक्षणातील त्यांच्या महान कामगिरीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने कृतज्ञतेच्या भावनेतून सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला दिलं.अत: सावित्रीबाई फुले यांना त्रिवार मानाचा मुजरा!

भारतातील प्रत्येक जिल्ह्यात अन् खेड्यापाड्यात परिचित असलेला शालीन चेहरा म्हणजे  प्रियदर्शिनी इंदिरा गांधी. स्व.इंदिरा गांधी ह्या आपल्या स्वकर्तुत्वाने भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.इतकेच नव्हे तर,जगातील १२० तटस्थ राष्ट्रांच्या संघटनेच्या त्या अध्यक्ष बनून जागतिक कीर्तीच्या नेत्या म्हणून सर्वदूर ओळखल्या गेल्या.त्यांच्या प्रभावी व कणखर अशा राजकीय भूमिकेमुळे भारताला सातासमुद्रापार नावलौकिक मिळाला.इंदिरा गांधींना आम्ही सर्वधर्मीय नागरिक आजच्या शुभ दिनी प्रणाम करतो.

स्री ही प्रत्येक युगात सर्वश्रेष्ठ ठरली आहे. म्हणूनच तिचं नाव अग्रभागी घेतलं जातं.उदा.लक्ष्मीनारायण, सीताराम,राधेश्याम! श्री गजाननाची मातोश्री मां पार्वती,प्रभुरामाची मातोश्री माता कौशल्या,श्री हनुमानची माता अंजलीदेवी,भगवान श्रीकृष्णाची मातोश्री देवकी व यशोदा यांच्या संस्कारांमुळे अन् शिकवणीमुळे त्यांच्या सुपुत्रांनी आपले नाव साऱ्या त्रिलोकात अजरामर केलं.ही आहे खरी आईची महिमा! अशा महान देवीमातांना  आम्ही सकल हिंदुजन  साष्टांग नमन करतो.

महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील नाडगाव या  खेड्यात शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या सौ.प्रतिभाताई देविसिंह पाटील-शेखावत यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून शिवरायांच्या महाराष्ट्राला देशात मानाचं स्थान मिळवून दिलं.तसेच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षात त्यांनी शेवटपर्यंत निष्ठापूर्वक कार्य केल्याने त्यांना देशाच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदावर विराजमान होण्याची संधी लाभली.त्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून गणल्या गेल्या.यास्तव ताईंना महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! तथाकथित रुढीप्रिय-कर्मकांडी समाजाकडून स्त्रीयांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध काव्याच्या माध्यमातून वाचा फोडून समाजात जनजागृती करणाऱ्या अहिराणी भाषेच्या खानदेशी कवियत्री बहिणाबाई चौधरी यांना महिला दिनानिमित्त अभिवादन!

घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते.राज्यकर्त्यांनी स्त्रियांना राजकारणात अधिक प्रतिनिधित्व द्यावे,असे त्यांनी आवाहन केलं.भारतीय लोकशाही अधिकाधिक लोकाभिमुख व मजबूत करण्यासाठी स्त्रियांचा राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग असायला पाहिजे,असा मोलाचा सल्ला त्यांनी राज्यकर्त्यांना दिला. मनूस्मृतीने स्त्रियांचे जीवन चूल अन् मूल या चौकटीत बंदिस्त केलं होतं.त्यांना शिक्षणापासून कोसो दूर ठेवलं.त्यांना गुलामासारखी वागणूक देऊन,भोग वस्तू म्हणून हिणवले.या सर्व अमानवीय गोष्टींमुळे डॉ.बाबासाहेबांचा राग अनावर झाला.त्यांनी याचा तीव्र विरोध करत स्त्री पुरुषमधील असमानता दर्शविणाऱ्या मनुस्मृतीची जाहीर होळी केली.अशा महान लोकहितवादी  युगपुरुषाला जन्म देणाऱ्या त्यांच्या मातोश्री भीमाबाई आंबेडकर तसेच त्यांना पारिवारिक जीवनात मोलाची साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर आणि माईसाहेब सविता आंबेडकर यांना जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही नमन करतो.

स्त्री शिक्षणाला कर्मकांडी समाजाकडून तीव्र विरोध होत असताना,ठाणे जिल्ह्यातील कल्याणची सुकन्या डॉ.आनंदीबाई जोशी यांनी तत्कालिन समाजाची बंधने झुगारून,उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाऊन एम.डी.ही वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवी संपादन केली.विशेष म्हणजे आनंदीबाई ह्या विदेशात शिकून पारतंत्र्यात डॉक्टर होणाऱ्या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर म्हणून गणल्या गेल्या.त्यांनी आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग समाजातील गोरगरिब,निराधार,निर्धन महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी केला.महत्वाचे म्हणजे पुढच्या पिढीतील महिला डॉक्टरांसाठी डॉ.आनंदीबाई जोशी ह्या रोल मॉडेल ठरल्या आहेत.डॉ.आनंदीबाई जोशींनी नवोदित महिला डॉक्टरांना ग्रामीण भागातील गोरगरीब महिलांच्या आरोग्याची काळजी घेऊन कुपोषणाची जटिल समस्या मिटविण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. महिला दिनानिमित्त डॉ.आनंदीबाई जोशी यांना भावपूर्ण अभिवादन!

भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्या थोर महिलांनी योगदान दिलं, त्यात सरोजिनी नायडू,अरुणा असफ अली,उषा मेहता,मॅडम भिकाजी कामा,कस्तुरबा गांधी,बेगम हजरत महल,कमला नेहरू, अँनी बेझंट,विजया लक्ष्मी पंडित यांचा समावेश आहे.या सर्व शूरवीर महिलांना आजच्या मंगलमय दिनी आमचा त्रिवार मानाचा मुजरा!

जगविख्यात गायिका,स्वर सम्राज्ञी भारतरत्न स्व.लता मंगेशकर यांनी आपल्या करियरमध्ये विविध भाषेत ३० हजारहून अधिक गीतं गाऊन विश्वविक्रम केला.आज जरी त्या हयात नसल्या तरी,भारतियांच्या हृदयात त्यांना चिरकाल मानाचं स्थान राहिलं आहे.भारतरत्न लताजींना आमचा त्रिवार मानाचा मुजरा.

जागतिकस्तरावर गोरगरीब,अबला,निराधार जनतेची उल्लेखनीय सेवा  केल्याबद्दल भारत सरकारने मदर तेरेसा यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केलं.यास्तव जागतिक महिला दिनी त्यांचं स्मरण होणे क्रमप्राप्तच ठरते.त्यांना दंडवत प्रणाम.

प्रख्यात गायिका आशा भोसले,अनुराधा पौडवाल,सुनिती चौहान, श्रेया घोषाळ व अन्य नवोदित गायिका ज्यांनी आपल्या सुमधुर गायिकीने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले,त्या सर्वांना आमचा सलाम तसेच सिने अभिनेत्री स्व.नर्गिस,वहिदा रेहमान,हेमा मालिनी,शबाना आजमी,आशा पारेख,माधुरी दीक्षित आदींनी आजीवन लोकांचे मनोरंजन केलं,याबद्दल त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा!

मराठी चित्रपटातील अभिनेत्रींनी देखील आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.अशा अलका कुबल,निशिगंधा लाड,किशोरी शहाणे,निवेदिता सराफ,सई ताम्हणकर,सोनाली कुलकर्णी,मृणाल कुलकर्णी,वर्षा उसगावकर,रेणुका शहाणे,मुक्ता बर्वे,अमृता खानविलकर,प्राजक्ता माळी आदींना जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

न्यायदानाचे पवित्र कार्य करून सर्वधर्मीय लोकांना न्याय देऊन त्यांच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण केलं,अशा ख्यातनाम न्यायमूर्ती सुजाता मेहता,न्या.रंजना देसाई,इंदिरा बॅनर्जी,फातिमा बिवी,रुमा पाल,ज्ञान सुधा मिश्रा,इंदू मल्होत्रा,हिमा कोहली,बी.वी.नागरत्न,बेला त्रिवेदी आदी सन्माननीय महिला न्यायाधीशांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

समाज कार्यात आपलं सर्वस्व पणाला लावून आबालवृद्धांची,निराधार समाज घटकांची अविरत सेवा करणाऱ्या स्व.सिंधुताई सपकाळ,मंदाकिनी

आमटे,राणी बंग,किरण बेदी,मेधा पाटकर आदींना महिला दिनाच्या शुभेच्छा.उद्योग जगतात भारताचे नाव अजरामर करणाऱ्या निता अंबानी,अनु आगा,विणा पाटील आदी प्रख्यात उद्योजक महिलांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.ख्यातनाम महिला पायलट सरला ठकराल,स्व.कल्पना चावला,सुनीता विल्यम्स यांनाही महिला दिनानिमित्त भावपूर्णअभिवादन.

राजकीय-सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या सोनिया गांधी, सुप्रिया सुळे,स्मृती इराणी, भारती पवार,निलम गोऱ्हे, भावना गवळी,पंकजा मुंडे,जया बच्चन,ममता बॅनर्जी,पुनम महाजन,नवनीत राणा,डॉ.हिना गावित,किशोरी पेडणेकर,मीनाक्षी शिंदे,पल्लवी कदम आदी कर्तबगार भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रशासकीय सेवेत आपल्या कर्तबगारीची छाप पाडणाऱ्या मनीषा म्हैसकर,मेधा गाडगीळ,मनीषा वर्मा,वत्सला नायर-सिंह,विनिता सिंघल,वंदना कृष्णा यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.कर्तव्यदक्ष,

कार्यतत्पर व करड्या प्रशासकीय शिस्तीच्या महिला सनदी अधिकारी मनिषा म्हैसकर मॅडम यांनी तर स्वच्छ भारत अभियान मध्ये महाराष्ट्राला अव्वल स्थान प्राप्त करून दिलं.याबद्दल दिल्ली येथे मा.राष्ट्रपती,मा.पंतप्रधान यांच्या हस्ते तर,मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.यास्तव त्यांच्यासह अन्य महिला सनदी अधिकारींना जागतिक महिला दिनाच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा.

त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रात देशाला नावलौकिक मिळवून देणाऱ्या मेरी कॉम,सायना नेहवाल,राही सरनोबत,सानिया मिर्झा आदी नवोदित क्रीडापटूंना महिला दिनाच्या शुभेच्छा.साहित्य-कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या दुर्गा भागवत, विजया वाड,अरूणा ढेरे, विजया राजाध्यक्ष आणि पत्रकारिता क्षेत्रात आपल्या प्रबळ लेखणीने समाजातील विविध जाती-धर्मातील लोकांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार जयश्री खाडिलकर,कुमुद चावरे, राही भिडे,नीला उपाध्ये व नवोदित महिला पत्रकारांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आर्थिक नियोजन कसे करावे,बचत कशी करावी,गुंतवणूक कोठे कोठे करावी,या बाबींची माहिती घरोघर पोहोचावी,या उद्देशाने मार्गदर्शन करणाऱ्या

अर्थरचनाकार सनदी लेखापाल (सीए) रचना रानडे यांना नुकतेच मटा सन्मान युथ आयकॉन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.रानडे मॅडम ह्या डिजिटल माध्यमातून हर घर इन्व्हेस्टर हा व्यक्तिगत आर्थिक नियोजनाचा अभ्यासक्रम मराठीसह अन्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देणार आहेत.अशा पद्धतीने देशभरात आर्थिक साक्षरतेचे जागर करण्याचा संकल्प करणाऱ्या रचना रानडे यांना जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

मराठी व हिंदी

दूरचित्रवाहिन्यांमध्ये प्रभावीपणे बातम्या देऊन नागरिकांना राज्यासह देश व परदेशातील सर्व क्षेत्रांच्या घडामोडींची यथेच्छ माहिती देणाऱ्या जाबांज महिला

वृत्तनिवेदिका रूबिका लियाकत,श्वेता सिंह,अंजना ओम कश्यप,रेणुका जोशी,फराह खान,करुणा ढोले,मेघना घाग,रिशी देसाई,ज्ञानदा कदम,प्रज्ञा पोवले आदींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

महिला दिनाचे औचित्य साधून,युवा मुलींना/महिलांना आवाहन करावयासे वाटते  की,दैनंदिन जीवनात वावरताना कधी कधी दुर्दैवाने महिलांवर विविध प्रकारे हल्ले होत असतात.त्यावर रामबाण उपाय म्हणजे मुलींनी शालेय जीवनापासूनच स्वरक्षणार्थ मार्शल आर्ट चे प्रशिक्षण घेतले पाहिजे.जेणेकरून त्या संकटसमयी आपला बचाव स्वतःच करू शकतील.

मित्रहो,२१ व्या शतकात भारतीय महिला आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर विविध क्षेत्रात अग्रेसर होताना दिसत आहेत.त्यांच्या प्रगतीच्या आड येणं आता कोणालाही कदापि शक्य होणे नाही.कारण त्यांच्या प्रगतीचा आलेख उत्तुंग शिखरावर पोहोचला आहे.स्त्री ही अबला नसून सबला आहे,हे तिने प्रत्यक्ष कृतीने सिद्ध करून दाखविले आहे.मुलींनी खूप खूप शिकावं अन् आपल्या स्वतःचा व राज्यासह देशाचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी खारीचा वाटा उचलावा.तमाम सावित्रीच्या लेकींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाज तभी होगा महान…

जब होगा नारी का सन्मान! ——————————————————————————————————————————————-

Leave a comment