मनात विचार करणे, मग तो शब्दांत अथवा वाक्यात बसवणे व नंतर ते लिहून काढणे असे तीन प्रकार मनाने लेखनात येतात.

प्रथम मनात विचार आले पाहिजेत. मग ते भाषेत बसविता आले पाहिजेत व ती भाषा लिहिता आली पाहिजे.

अनुलेखन व श्रुतलेखन म्हणजे पाहून पाहून व ऐकून लिहिता येऊ लागले म्हणजे लेखन बरेचसे पक्के होते. फक्त या लेखनात विचार करावयाचा नसतो व विचारास भाषेत बसवायचाही नसतो. विचार व भाषा लेखकाची असतात. मूल फक्त लेखनाची क्रिया करीत असते. पुस्तकात असलेले घर, कमल, नळ हे शब्द पाहून मुलांनी लिहिले म्हणजे नुसती अक्षरे लिहिण्याची क्रिया मुलांनी केली.

तेच मुलास आपण श्रुतलेखन घालतो त्यावेळी मुलाला थोडी निराळी क्रिया करावी लागते. अनुलेखनात काय लिहावयाचे तेही पुस्तकात असते व ते कसे लिहावयाचे हे समोरच दिसत असते. शुद्धलेखनात काय लिहावयाचे ते मास्तर सांगतात पण ते कसे लिहावयाचे हे मुलास आठवून लिहावयाचे असते.

आपण म्हणालो, “लिहा, ताटवाटी,” तर ता कसा, ट कसा, हे सगळे आठवून लिहावयास हवे.

परंतु तेच मुलांना म्हटले की तू काय जेवलास ते लिही. मूल विचार करू लागते, काय बर जेवलो? पोळी. मग पोळी लिहिते. वरण तूप आठवते, मग ते लिहिते.

अशा लेखनास निबंध लेखनाची अथवा मनाने लेखनाची सुरुवात म्हणता येईल. ही अनुलेखन व शुद्धलेखनाच्या पुढची पायरी होय. यात काय लिहावयाचे ते आधी आठवावे लागते अथवा विचार करावा लागतो व मग ते कसे लिहावयाचे तेही शुद्धलेखनाप्रमाणे आठवावे लागते.

बालवर्गात लेखनाची सुरुवात असते. तेथे अनुलेखन व शुद्धलेखन बरेचसे लिहून झाले म्हणजे मनाने लेखन सुरू करण्यास हरकत नाही. मुले नुसते साधे शब्दच लिहितील, पण ते स्वतः विचार करून लिहितील. निबंधाचा जसा विषय देतात तसे यांनाही आपण काय लिहावयाचे त्याचा विषय दिल्यास त्यांना लिहिणे सोपे जाते. मग हळूहळू ती स्वतःच विषयही शोधून काढतात.

सामान्यतः खालील प्रकार मनाने लेखनास चांगले पडतात.

  1. एखादे चित्र समोर टांगावे व त्याकडे पाहून शब्द लिहिण्यास सांगावे.

सरस्वतीच्या चित्राकडे पाहून खालील शब्द लिहू शकतील – देवी, माळ, मोर, वीणा, दगड, फूल, झाड, पाणी, पोथी, मुकुट वगैरे.

प्रथम त्यांना जर सुचत नसले तर आपण चित्राकडे पाहून शब्द सांगण्यास सुरुवात करावी. मुलांना काही सुचले तर सांगण्याची सूट ठेवावी. मुले कितीतरी शब्द सांगू लागतील. काही दिवसांनी आपल्याला सांगण्याची जरूरच राहणार नाही.

2. खिडकीतून बाहेर पाहून जे दिसेल ते लिहा.

सामान्यतः आकाश, झाड, फाटक, गाडी, कुत्रा, माणूस, घर, दार, खिडकी,बाग वगैरे शब्द येतील.

3. वर्गात काय दिसते ते लिहा.

मुले टेबल, वही, मणी, ठोकळे, फळा, खडू, बाई, चित्र, नकाशा वगैरे लिहितील.

4. काय जेवलात ते लिहा.

भात, पोळी, भाजी, भाकरी, वरण, तूप, साखर, दही, ताक, आमटी, चटणी वगैरे.

5. तुमच्या 10 मित्रांची नावे लिहा.

बाळ, बंडू, शांता, चंदु, शशी, विमल, भाई, रमेश, सुभाष, सरला वगैरे.

6. तुमच्या वस्तूंची नावे लिहा.

7. घरच्या वस्तूंची नावे लिहा.

8. फळांची नावे लिहा.

9. फुलांची नावे लिहा.

10. दहा जनावरांची नावे लिहा.

11. दहा पक्ष्यांची नावे लिहा.

12. फिरायला गेला तेव्हा काय पाहिलेत?

एकदा मुले स्वतःविचार करून लिहू लागली की मग पुष्कळदा तर विषय द्यावाच लागत नाही. तीच विषय निवडून शब्द लिहू लागतात.

अशा लिहण्यात जोडाक्षरे आल्यास पुष्कळदा अडचण उत्पन्न होते. पण लिहिता येणार नाही तो शब्द सध्या सोडून द्या असे म्हटले म्हणजे गाडी चालू होते .

मनाने लेखनास निराळी वही द्यावी. आपली नेहमीच्या आकाराची वही असल्यास पानावर मध्ये रेघ काढून एक एक शब्द लिहिण्यास दाखवावा. नेहमीच्या वहीच्या अर्ध्या आकाराच्या (उभ्या कापलेल्या) वह्या ठेवल्यास एकेका रेघेवर एकेक शब्द लिहिणे मुलांना सोईचे असते. काटकसरीकरता अनुलेखन व शुद्धलेखन पाटीवर लिहावयास दिले तरी चालेल. मनाने लेखन मात्र वहीवरच करू द्यावे, कारण त्यावरून मुलांना काय सुचते आहे ते आपणास कळते.

शब्द लेखनानंतर वाक्ये लिहिण्याचे दाखवावे. सामान्यतः हे काम पहिल्या इयत्तेची मुले करू शकतात.  

आता शुध्दलेखनाच्या वेळी आपण वाक्ये घालावी.

मोर नाचतो.  

हरीण धावते.

चिमणी उडते.

अशी आपण वाक्ये घालू लागलो व त्यांना सांगितले आता वाक्ये लिहा, फक्त शब्द पुरा झाला की थोडी जागा सोडा, व हे कसे करायचे ते फळ्यावर दाखवले की काही दिवसांनी मुलांना व्यवस्थितपणे वाक्ये लिहिता येऊ लागतात.

गाय गवत खाते.

चंदू धडा लिहितो.

उषा शिवण शिवते.

याप्रमाणे नीटपणे ती लिहू लागली म्हणजे वाक्ये कशी लिहावयाची त्यांना कळू लागले व तसाच विचार करता व लिहिता येऊ लागले म्हणजे त्यांची त्यांना वाक्ये लिहिण्यास सांगावे.

येथेही मदत म्हणून चित्रे टांगावी, अथवा शब्द द्यावेत. शिपाई, वाघ, आगगाडी, विमान यांची चार वाक्ये  लिहा. मुले बरोबर छानशी वाक्ये लिहितात.

कधी मधलाच तर कधी शेवटचा शब्द दिला तरी मुले वाक्ये तयार करू शकतात. पडला, भात, गाडीत, यावरून शशी पडला. मी भात खातो. मी गाडीत बसतो. वगैरे वाक्ये मुले सहज करतात.

कधी वाक्य-पूर्ती दिली तर त्याचीही त्यांना मजा वाटते.

पोपट पेरू….

मी सतरंजीवर….

सरला….बसली.

मोटार…धावते. वगैरे.

याप्रमाणे वाक्य जुळवून लिहिता येऊ लागली की मुलांच्या लेखनास पंख आल्यासारखे होते. प्रथम ती हळूहळू वाक्य बनवीत बसतात. कारण डोक्यात विचार येतो तितके भरधाव त्यांना लिहिता येत नसते. पण त्यांची गती हळूहळू वाढू लागते. विशेषत: विचार खूप जोराने चालू होतात. मग लिहिण्यात चुका झाल्या तरी त्याची पर्वा न करता मुले लिहू लागतात.

अशा वेळी मुले पुष्कळदा अक्षरे काना मात्रा वगैरे काढतात. ‘एक होता कोल्हा’ अशा प्रकारे लिहू लागतात. तसेच अक्षरेही जरा वेडीवाकडी काढण्याची वृत्ती उत्पन्न होते. त्यावेळी शिक्षकाने त्यांना न थांबवता लिहू द्यावे. एरव्ही अनुभव लेखन, शुद्धलेखन व सुलेखन ही तिन्ही चालू ठेवावी. पाहून रोज पाच ओळी आणायच्याच व त्या सुंदर चांगल्या अक्षरात असा यापुढे नियम ठेवण्यासही हरकत नाही. तसेच शाळेत एक दिवस मनाने लेखन तर एक दिवस शुद्धलेखन असेही ठेवले पाहिजे व शुद्धलेखन सावकाश, अक्षरे न खाता व चांगल्या अक्षरात लिहिण्याची सवय ठेवावी. यावेळी भरभर लिहिण्याकडे मुलांचा हात जात असला तरी ‘सुंदर व बरोबर लिहा’ अशी वारंवार सूचना देऊन पुन्हा पुन्हा ते वाक्य स्पष्ट बोलून त्यांची गती आपण धीमी पाडावी. कारण यावेळी ती लवकर लिहू लागली की अक्षरे अपुरी व वेडीवाकडी काढणे, काना मात्रा गाळणे वगैरे प्रकार होतात व तशीच सवय पडल्यास सुधारणे कठीण जाते.

फक्त स्वतः मनाने लिहीत असताना विचारांच्या गतीमुळे अक्षर जरा वाईट आले किंवा काना मात्रा गाळलेल्या असल्या तर त्याकडे लक्ष वेधावेच. सुधारून द्यावे. परंतु त्यावर फारच भार देऊ नये. कारण त्यामुळे विचारांची गती थांबण्याचा संभव असतो. लहान लहान वाक्ये लिहिता लिहिता मुलांना खूप मोठाली वाक्य सुचू लागतात. सबंध गोष्टीच्या गोष्टी सुचू लागतात. विचारांचा प्रवाह फार मौल्यवान असतो. तो अस्खलित वाहील असेच आपण केले पाहिजे.

ही झाली विचार सुचण्याची बाब. तोच विचार कोणत्या भाषेत बसवायचा हे शिक्षकाने शुद्धलेखनाच्या वेळी दाखवीत गेल्यास मुलांना मनाने लेखनास खूप मदत होते. शुद्धलेखन घालताना शिक्षक शैली व भाषा दोन्हीचे धडे देऊ शकतो.

धाड् धाड् धाड् करीत गाडी चालली.

जमीन हादरली, झाडे हलली.

पक्षीही गुपचूप बघत बसले.

गाडीने एक मोठी शिटी फुंकली.

खाड् खाड् खाड् निघून गेली.

आपण जर अगदी जोरात, भावनालुप्त होऊन वर्णन करून शुद्धलेखन घालू लागलो तर मुले शुद्धलेखन  लिहितात, इतकेच नाही तर त्यात रंगून जातात. शुद्धलेखनाचा तास हा शिक्षकाच्या मनाने लेखनाचा तास असे त्यांना वाटते व शिक्षक कोणत्या भाषेत विचार करतो, कोणत्या शैलीत लिहितो ते पाहण्यास ती आतुर असतात.

तर मुलांच्या कलाचा अभ्यास करून त्यांच्या गरजा शिक्षकाने भागवल्या पाहिजेत.

सामान्य शाळेत शुद्धलेखनाचा अथवा निबंधाचा, दोन्ही तास मुलांना फारसे प्रिय नसतात. पण माझ्या अनुभवात असे आले आहे की मुलांना हे दोन्ही अत्यंत प्रिय होऊ शकतात. शिक्षकाने पुस्तकातून शुद्धलेखन घालायचे व ऱ्हस्व, दीर्घ, अनुस्वाराच्या चुका काढायच्या एवढेच केले तर शुद्धलेखन कसे आवडणार? पण तेच काम वरील प्रकारे शिक्षक अत्यंत रसभरीत करू शकतो.

Leave a comment