आपण मुलांसमोर सहजपणे वागत असतो.आपल्या वागण्याबोलण्यात कोणते शब्द येतात.कोणत्या हालचाली आपण करतो.चेहऱ्यावरील हावभाव कसे असतात या गोष्टींचा विचारही आपल्या मनात येत नाही.आपण कळत नकळत मुलांच्या अस्तित्वाचं भान राहत नाही.मुलं लहान असल्यापासून तुमच्या प्रत्येक शब्द आणि कृतीचं अनुकरण करत असतात.म्हणूनच आपण सजग होऊन वागणं आवश्यक आहे.
काही गोष्टी मुलांसमोर टाळणं अतिशय आवश्यक आहे.
जसं की
●मुलांसमोर आपण अपशब्द वापरले,वाईट भाषा वापरली तर मुलांना ते शब्द, ती भाषा वापरताना काहीच चुकीचे वाटत नाही.शाळेत, घरी किंवा इतरांसमोर जर मुलं अशी abusive language वापरत असतील तर त्याचं मूळ आपल्या घरात तर नाही ना हे बघण्याची वेळ येऊ देऊ नका.
●तुमच्या चांगल्या अथवा वाईट आर्थिक परिस्थितीवरून मुलांना दोष देऊ नका.तू जन्माला आल्यापासून पनवती लागली आहे किंवा खरंच तुझा पायगुण छान आहे.आपली भरभराट झाली आहे.अशा दोन्ही बोलण्याने मुलांच्या मनावर परिणाम होतो.आर्थिक परिस्थिती बिघडत चालली आहे असे म्हटले तर भविष्यात येणा-या प्रत्येक संकटांना आपण जबाबदार आहोत असं मुलांना वाटतं तर त्यांच्या पायगुणांबाबत बोलल्याने ती शेफारुन जाऊ शकतात.
●मुलांसमोर तुमची नवराबायकोची टोकाची, पराकोटीची आणि वारंवार भांडणं होत असली तर त्यामुळे मुलांच्या मनावर त्याचा ताण येतो.वातावरणातही स्ट्रेस येतो.मुलांना असुरक्षित वाटतं.भांडणाने प्रश्न सुटण्याऐवजी कटुता वाढतच जाते. त्यापेक्षा संवादाने किंवा चर्चा करुन प्रश्न सोडवता येतील.
●कुटुंबातील सदस्य, मित्र मैत्रिणी,नातेवाईक, शाळा,शिक्षक यांच्याविषयी शेरेबाजी करु नका.अन्यथा मुलंही तुमच्यासारखे टोमणे मारतील.जजमेंटल होतील.तुमच्या टीकेमुळे,शब्दांमुळे मुलांनाही तिरकस बोलण्याची सवय लागेल. त्यांची स्वतःची सहनशीलता कमी होत जाईल.
●स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करु नका.सुखदुःख दोन्ही भावना व्यक्त करा.नाहीतर मुलंही भावना व्यक्त न करता दडवून ठेवायला शिकतील.गप्पच राहतील.भावना कधी,किती आणि कशा व्यक्त करायच्या असतात हे मुलं तुमच्याकडून शिकतील.
●तुम्ही जर स्मोकिंग,ड्रिकिंग करत असाल,जोडीदाराला मारहाण करत असाल तर ताबडतोब हे बंद करा.मुलांसमोर तर मुळीच नको.तुमच्या या व्यसनांमुळे मुलांना धोका निर्माण होत आहे .अतिशय चुकीचे आदर्श त्यांना देताय ह्याचा गांभीर्याने विचार करा व कृती करा.
●बाहेरून आल्यावर किंवा घरात असताना सतत मोबाईल, टी.व्ही, लॅपटॉप इ.डिजिटल माध्यमाचा सतत वापर टाळाच.कुटुंबाकडे तुमचं
दुर्लक्ष होतंय हे कळतंय नं तुम्हाला. मुलांनाही तुमच्यामुळे चुकीच्या सवयी लागताहेत.संवाद कमी होतोय याचं भान राखा.
●नियम तोडणं,बेकायदेशीर वागणं,सिग्नल तोडणे,नो एन्ट्री मध्ये गाडी घालणं,खोटं बोलणं,फसवणूक हे जर आपल्याकडून मुलांसमोर घडत असेल तर यातून कायदा पाहायचा नसतो,त्याचा आदर राखायचा
नसतो हेच मुलं शिकतील.
आपण पालक मुलांचे आदर्श आहोत.आपल्या वागण्याबोलण्यात मुलांवर खोलवर परिणाम होत असतो हे विसरु नका.