मानवी जीवनात शिक्षणाचं महत्व फार आहे. शिकणं ही माणसाची उपजत प्रवृत्ती आहे. प्राणी जगतात जगण्याची कला काही उपजत तर काही शिक्षणातून, अनुभवातून साध्य होते. साधं कुत्र्याच्या पिल्लाचं उदाहरण घेतलं तरी असं दिसतं की जन्मतःच त्याचे डोळे उघडलेले नसतात. तरीही ते त्याच्या आईचे स्तन बरोबर शोधून काढतो आणि लुचतो. हे पिल्लू मोठं होत जातं, तसतसं त्याचं प्रशिक्षण सुरु असतं. कुत्र्याची पिल्लं त्याच्या आईबरोबर खेळताना ज्यांनी पाहिली असतील त्यांच्या लक्षात येईल की कुत्री त्या खेळातून पिल्लाला जीवनाचे धडे देत असते. धावायचं कसं? पाठलाग कसा करायचा? हल्ला कसा करायचा? हल्ला चुकवायचा कसा? कुरघोडी कशी करायची आणि वेळ आल्यास जीव बचावून पळून कसं जायचं हे श्वान जीवनात जगण्यासाठी आवश्यक शिक्षण या खेळातून मिळत असतं. या शिक्षणाला पुढे अनुभवाची जोड मिळत जाते. त्यातून गिरवलेले धडे पक्के होत जातात. शिकारी प्राण्यांचं शिक्षण प्रामुख्याने हल्ला कसा करायचा हेच असतं. तर हरणासारखे शिकार होणारे प्राणी संकट येताच तिथून चटकन् पळून जाऊन जीव कसा वाचवायचा याचंच शिक्षण आपल्या पिल्लांना देतात. हरीण काही वाघाशी टक्कर देऊ शकत नाही. म्हणून शक्य तितक्या वेगाने वाघापासून दूर पळून जाण्याची कला शिकणं त्याच्यासाठी महत्वाचं असतं. वाघ गवत खाऊन राहू शकत नाही. त्यामुळे तो जर शिकार करु शकला नाही तर जगू शकणार नाही. म्हणून त्याला शिकार करण्याचं शिक्षण योग्य वयात मिळणं हे त्याच्या हिताचं असतं. ज्याने हित साधलं जाईल असं शिक्षण देणं ही नीती असली पाहिजे. योग्य शिक्षण मिळालं नाही तर काय होतं त्याचं प्रत्यंतर मानवाच्या इतिहासात वारंवार आलं आहे. प्राणी जगतातलं जगणं एका अर्थाने सोपं नसलं तरी साधं, सरळ आहे. पण मानवी जगणं फार, फार गुंतागुंतीचं आहे. मानवी जगण्याचा परिघ प्रचंड व्यापक आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती आज पाहिली तर लाखो शेतकऱ्यांनी आजवर आत्महत्या केल्या. दिवसे न् दिवस शेतकरी नागवला जातो आहे. पूर्वी जगण्यासाठी मातीतून धान्य पिकवण्याची कला कुणब्याकडे असली तर पुरेशी होती. त्या बळावर तो स्वतःही जगत होता आणि सर्व समाजालाही जगवत होता. पण आज नुसतं पिकवता येण्याची कला पुरेशी नाही. विकण्याची कलाही शेतकऱ्याला अवगत करावी लागेल. विकण्याची कलाही पुरेशी नाही तर वर जे सत्तेत बसले आहे त्यांना वेसण घालण्याची वा तिथून हटवण्याची कलाही शेतकऱ्याला आता शिकावी लागेल. आपल्या हक्कासाठी लढायला शिकावं लागेल.विविधांगी शिक्षण शहाजी महाराजांनी शिवरायांना दिलं. आपला पुत्र विश्ववंद्य व्हावा असं स्वप्न पाहणारा शहाजी महाराजांसारखा दुसरा पिता मानवाच्या इतिहासात दुसरा कोणी नाही. आपल्या पुत्राला जी इतिहासदत्त जबाबदारी पेलायची होती तिला आवश्यक आणि हिताचं शिक्षण शहाजी महाराजांनी आपल्या पुत्राला, शिवरायांना दिलं म्हणून मग पुढे नवा इतिहास घडला. युगपुरुष म्हणून शिवराय मानवी इतिहासात अजरामर झाले. शिक्षण इतकं महत्वाचं, प्रभावी आणि माणसाच्या आणि समाजाच्या भविष्यावर दूरगामी परिणाम करणारं असतं.मागच्या हजारो पिढ्या जशा गुलामीत जगल्या तशाच पुढच्या पिढ्यांनाही गुलामीत जगावं लागेल. हे जाणलं म्हणून महात्मा जोतीराव फुले यांनी शिक्षणापासून कामाला सुरुवात केली. म्हणून राजर्षी शाहू महाराज आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी शिक्षणप्रसारासाठी प्रयत्नांची शर्थ केली. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुमायांना, “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” असा संदेश दिला. म्हणून कर्मवीर भाऊराव पाटलांनी माझ्या डोक्यावर जितके केस आहेत तितकी बहुजनांची मुलं शिकवून तयार करीन अशी प्रतिज्ञा केली. म्हणून पंजाबराव देशमुख, यशवंतराव चव्हाण यासारख्या नेत्यांनी शिक्षणप्रसाराला अग्रक्रम दिला. समाजाचं हित साधायचं असेल तर त्याला तसं शिक्षण देण्याची नीती स्विकारावी लागेल असं तुकोबारायांनी चारशे वर्षांपूर्वी सांगितलं. आजही ते तितकंच महत्त्वाचं आणि उपयुक्त आहे आणि उद्याही ते तितकंच महत्वाचं आणि उपयुक्त राहिल. प्रत्येक समाजहितैषीसाठी ते दिशादर्शक होतं, आहे आणि असेल. तुकोबाराय म्हणतात,
*शिकवूनि हित । सोयी लावावे हे नीत ।।*
हिताचं ते शिकवून नीट मार्गाला लावणं यालाच नीती म्हणतात.(या नीतीचा) त्याग करु नये. नेमकं याच्या उलट काम इथं मनुस्मृती प्रणित चातुर्वर्ण व्यवस्थेने केलं. शिक्षणाच्या अंतर्भूत या ज्या क्रांतीकारक क्षमता आहेत त्या गर्भातच नष्ट करुन टाकण्यासाठी वर्णव्यवस्थेने सर्व स्त्रीया आणि शूद्रातीशूद्रांवर ज्ञानबंदी लादली आणि त्यांच्या हजारो पिढ्या अज्ञान अंधःकारात खितपत पडल्या गुलाम झाल्या. या लोकांना शिकूच द्यायचं नाही म्हणजे ते कधीही स्वतंत्र होऊ शकणार नाहीत असा प्रयत्न वर्णव्यवस्थेच्या लाभार्थ्यांनी शेवटपर्यंत केला.चुकीचा उपदेश करण्यात काही जण तरबेज असतात,चुकीचा रस्ता दाखवून एखाद्याचं वाट लावण्यात काही खूप हुशार असतात, अशा गोष्टीत त्यांना खूप आनंद होतो. अशा लोकांचा तुकोबाराय धिक्कार करतात.लोकांना त्यांचं भलं कशात आहे हे सांगावं, त्यांना सोयीला लावावं हेच हिताच आणि सदाचार आहे. एखाद्याला सोयीला लावता आलं नाही तरी चालेल, तर त्याची हरकत नाही. चुकीचा सल्ला देऊन त्याची वाट लावू नये. थोडक्यात काय तर एखादं चांगलं नाही करता आलं तरी चालेल पण वाईट तरी करू नका.


